जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग उभारणीसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य; १०२ उद्योगांसाठी १,४४५.६८ कोटींचे सामंजस्य करार

जळगाव,
दि. २१ ऑगस्ट २०२६| खान्देश लाईव्ह न्यूज|
जळगाव जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, औद्योगिक भूखंड, सक्षम दळणवळण व्यवस्था आणि निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना विदर्भाच्या धर्तीवर ‘डी प्लस’ दर्जा देण्यास मान्यता मिळाली असून, त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणे बाकी आहे. या अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊन जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी जळगावमध्ये नवीन उद्योग उभारावेत. उद्योग उभारणीसाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती द्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करणे, नवीन उद्योगांना चालना देणे आणि रोजगारनिर्मिती वाढविण्याच्या उद्देशाने उद्योग आयुक्तालय व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’ चे आयोजन हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी, जळगाव येथे करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने, उपायुक्त संतोष गवळी, शेंदुर्णी नगर परिषदेचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्यासह उद्योजक, उद्योग विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेत उद्योग विभागासोबत १०२ उद्योजकांनी सामंजस्य करार (एमओयू) केले. या करारांमधून १,४४५.६८ कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक होणार असून, ४,७१६ रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. जळगाव जिल्ह्यात उद्योग उभारण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योजकांना सामंजस्य करारांचे वितरण करण्यात आले. एमओयू केलेल्या उद्योजकांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील गुंतवणूक परिषदांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे ८० टक्के उद्दिष्टपूर्ती झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने यांनी केले, तर सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. परिषदेला जिल्ह्यातील तसेच जळगाव शहरातील उद्योजक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button