ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…!

खान्देश लाईव्ह न्युज|
१२ एप्रिल २०२६|
भारतीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसले यांना प्रकृती बिघडल्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका तसेच फुफ्फुसाशी संबंधित त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर येताच देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत यापूर्वी चिंता व्यक्त करत त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली होती.

आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गाऊन संगीतसृष्टीवर अमिट छाप सोडली. विविध भाषांमध्ये आणि शैलींमध्ये त्यांनी गायन करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी होत्या.

2023 साली वयाच्या 90 व्या वर्षी दुबई येथे लाइव्ह कॉन्सर्ट करून त्यांनी चाहत्यांना थक्क केले होते. त्यांच्या आवाजातील जादू आणि उर्जा शेवटपर्यंत कायम होती.

त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राने एक अनमोल रत्न गमावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button