भोकर येथील रा.ना.लाठी माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन
खान्देश लाईव्ह न्यूज |आज दि.२८ मार्च २०२६|
भोकर येथील रा.ना.लाठी माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रा.आ.केंद्र कानळदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पराग पवार तसेच भोकर येथील आरोग्य सेवक अमोल भालेराव यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छता, संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच जलजन्य आजार जसे अतिसार, टायफॉईड, कॉलरा यापासून बचावासाठी स्वच्छ व उकळलेले पाणी पिणे, जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुणे, अन्न झाकून ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कीटकजन्य आजार जसे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया याबाबतही माहिती देऊन घराभोवती पाणी साचू न देणे, कूलर व पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच “आठवड्यातून एक दिवस – ड्राय डे” पाळण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
तसेच मुलींसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या HPV (Human Papilloma Virus)लसीकरणाबद्दल जागृती करण्यात आली. HPV हा विषाणू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे योग्य वयात लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. ही लस सुरक्षित असून भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण करते.
विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी आत्मसात करून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, तसेच पालकांनीही लसीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमादरम्यान आरोग्य विषयक मार्गदर्शन काळजीपूर्वक ऐकून घेत त्यांनी विविध प्रश्न विचारले व योग्य माहिती जाणून घेतली.
तसेच या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री यू.बी चिंचाळे व सर्व शिक्षक वृंद यांचा सक्रिय सहभाग लाभला. सूत्रसंचालन श्रीमती सुरळकर यांनी केले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व यशस्वी ठरला.




