आरोग्यजळगावताज्या बातम्या

महामार्गावरील आयटीआयजवळील ‘घंटागाडी डेपो’ हटणार

खान्देश लाईव्ह न्युज|२५ फेब्रुवारी २०२५| मकरंद कुलकर्णी|
जळगाव |शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) प्रवेशद्वाराजवळ असलेल्या घंटागाडी डेपोमुळे विद्यार्थ्यांना होणारा कचऱ्याचा आणि दुर्गंधीचा त्रास आता लवकरच संपुष्टात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र तक्रारीची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी बुधवारी दि. २५ प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व हा डेपो तातडीने हलवण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि समस्या

आयटीआय कॉलेजच्या बाहेरच महानगरपालिकेच्या घंटागाड्यांचा डेपो आहे. या ठिकाणी एका गाडीतून दुसऱ्या मोठ्या गाडीत कचरा ट्रान्सफर केला जातो. यामुळे परिसरात भयंकर दुर्गंधी पसरते. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार प्रचंड दुर्गंधीमुळे वर्गात बसणे आणि अभ्यास करणे कठीण झाले आहे. जवळच कॉलेजचे कॅन्टीन असल्याने विद्यार्थ्यांना जेवण करणेही अशक्य झाले आहे. कचरा ट्रान्सफर करताना परिसरात घाण पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापौर व उपमहापौरांकडून प्रत्यक्ष पाहणी

विद्यार्थ्यांनी या समस्येबाबत महापौर व उपमहापौरांकडे दाद मागितली होती. त्यानुसार, बुधवारी दुपारी महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी आयटीआय परिसरात भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावर त्वरित पर्याय शोधण्याचे निर्देश दिले.

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि अभ्यासाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येथील दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास रास्त आहे. त्यामुळे हा घंटागाडी डेपो येथून लवकरात लवकर हलवला जाईल,” असे आश्वासन महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी यावेळी दिले. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे आयटीआयच्या शेकडो विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button