शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२८ स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट

जळगाव दि.२६ जानेवारी २०२६|खान्देश लाईव्ह न्यूज|
प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२४–२५ मधील मंजूर निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्न-की प्रकल्पातील 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अचूक निदान, कमी वेळ, अधिक सुविधा या अत्याधुनिक मशीनद्वारे मेंदूचे सीटी स्कॅन, शरीरातील विविध अवयवांचे प्लेन सीटी स्कॅन, कॉन्ट्रास्टसह सीटी स्कॅन, अब्डॉमेन व पेल्व्हिस संयुक्त तपासणी, बोन डेन्सिटोमेट्री, कार्डिएक सीटी, व्हॅस्क्युलर तसेच इतर विशेष तपासण्या कमी वेळेत व अधिक अचूकतेने करता येणार आहेत.
या सुविधेमुळे अपघातग्रस्त रुग्ण, हृदयरुग्ण, मेंदूविकारग्रस्त तसेच गंभीर आजारांच्या रुग्णांचे तातडीने निदान होऊन उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. पात्र रुग्णांना मोफत सेवा
शासन निर्णयानुसार पात्र रुग्णांना ही सेवा मोफत, तर इतर रुग्णांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरील खर्चाचा मोठा आर्थिक बोजा सर्वसामान्यांवर येणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयातीचे डॉक्टर, कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.



