एमपीएससीतर्फे विविध पदासाठी भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू
जळगाव |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण ३२० रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन तसेच अन्य विविध ग्रुप ए पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ यावर
जाऊन अर्ज सादर करू शकतात.
भरती मोहिमेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गातील २२५ पदे भरण्यात येणार आहेत. त्याच विभागातील विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील एकूण ९५ पदांच्या भरतीची आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना ७१९ रुपये तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ४४९ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.