जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलजागर जलसंधारण स्पर्धा आयोजित; नागरिकांना सहभागाचे आवाहन

जळगाव दि. २० मे २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे ‘जलजागर जलसंधारण स्पर्धा २०२४- २५’ ची घोषणा करण्यात आली असून ही स्पर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात जलसंपदेचे शाश्वत व्यवस्थापन आणि जनजागृती यासाठी ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ही वैयक्तिक व संस्थात्मक पातळीवर जलसंवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा उचित सन्मान करण्याकरिता आयोजित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नागरिक, शेतकरी, संस्था व खाजगी घटकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्दिष्ट व स्वरूप
या स्पर्धेमार्फत पाण्याचा शाश्वत वापर, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरणीय शाश्वतता या दृष्टीने विविध नाविन्यपूर्ण जलसंधारण उपायांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. *ग्रामीण व शहरी अशा दोन गटांत वैयक्तिक व संस्थात्मक* या प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाईल. घरांमध्ये सोसायट्यांमध्ये जलसंधारणाचे काम तसेच चेक डॅम, शेततळी, पावसाचे पाणी साठवण यंत्रणा, बंधारे, गाळ साठवण तलाव यासारख्या संरचना किंवा इतर नाविन्यपूर्ण उपाय स्पर्धेस पात्र असतील. या संरचना १ ऑक्टोबर २०२४ ते ३१ मे २०२५ दरम्यान पूर्ण झालेल्या असाव्यात.

पात्रता व अर्ज प्रक्रिया
जिल्ह्यात राहणारे किंवा कार्यरत असलेले कोणतेही व्यक्ती, संस्था किंवा घटक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अर्जा ची लिंक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://jalgaon.gov.in/) उपलब्ध असून २१ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करता येईल. अर्जासोबत संरचनेची माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ, पाण्याची बचत व सामुदायिक लाभाचे तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

मूल्यमापन निकष व बक्षिसे
संरचनेचे मूल्यमापन नाविन्य, पाण्याची बचत, शाश्वतता, सामुदायिक सहभाग आणि पर्यावरणीय योगदान या निकषांवर (एकूण १०० गुणांमध्ये) करण्यात येईल. १ ते ४ जून दरम्यान छाननी समितीद्वारे संरचनांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून, विजेत्यांची घोषणा ५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर करण्यात येईल. ग्रामीण व शहरी गटात वैयक्तिक तसेच संस्थात्मक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायती, स्थानिक संस्था व माध्यमांतून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

एक पाऊल जलसंपन्नतेकडे
ही स्पर्धा जिल्ह्यातील जलसंपदेचे रक्षण, भूजल वाढ आणि पर्यावरणीय संतुलन साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल. जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button