चोपडाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात इकोटुरिझमला चालना देण्यासाठी विशेष बैठक; निसर्ग संवर्धन आणि स्थानिकांना रोजगार यांचा समन्वय साधण्यावर भर

जळगाव, दि. १६ जुलै २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|

जळगाव जिल्ह्यातील निसर्गवैभवाचा शाश्वत उपयोग करत इकोटुरिझम (Ecotourism) क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील वनपर्यटन स्थळांचा विकास, पर्यावरणस्नेही उपाययोजना आणि स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

जळगाव जिल्हा वन विभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक निसर्ग पर्यटन स्थळे असून, त्यामध्ये गिरणा नदी परिसर, हतनूर धरण परिसर, सातपुडा डोंगररांगा आणि स्थानिक जैवविविधता असलेले भाग महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये बायोटॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची सोय, सायकल ट्रॅक, निसर्गशिबिरे, माहिती फलक, आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा प्रचार यांचा समावेश आहे.

 

बैठकीत वन विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्यात सशक्त समन्वय साधून प्रकल्प राबवण्यावर सहमती दर्शवण्यात आली. विशेषतः स्थानिक युवकांना इकोटुरिझम मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे, होम-स्टे योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे, तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला.

 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, “जळगावच्या निसर्गवैभवाचा संवर्धनासोबतच शाश्वत वापर करून रोजगार व अर्थकारण वाढवणे हे आपले उद्दिष्ट आहे”

या बैठकीत सर्व सहभागी घटकांनी दिलेल्या सूचना आणि उपाययोजना इकोटुरिझम धोरण अधिक प्रभावी आणि वास्तववादी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरल्या. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून लवकरच काही प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यातून जळगाव जिल्हा ‘हरित पर्यटन’ क्षेत्रात एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button