विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने ठिय्या आंदोलन

औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी
जळगाव अपडेट|खान्देश लाईव्ह न्यूज|औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र शासनाला या कबरीविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, भारत हा सनातन संस्कृती जपणारा देश आहे. या पवित्र भूमीवर धर्मविरोधी कृत्य करणाऱ्या क्रूर औरंगजेबाची कबर असणे हे देशासाठी अशोभनीय आहे. औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग यांचे सुपुत्र बालसाहेब जादे, तसेच गुरु तेजबहादूर सिंग यांची क्रूरपणे हत्या केली. त्याने काशी विश्वेश्वर मंदिर, मथुरेतील कृष्ण मंदिर आणि सोमनाथ मंदिर यासह अनेक हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ले केले.
कबर हटविण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत औरंगजेबाची कबर कायदेशीर मार्गाने हटविण्याची मागणी केली. अन्यथा, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने हिंदू समाजबांधव एकत्र येऊन ‘कार सेवा’द्वारे ती कबर हटवतील, असा इशारा देण्यात आला.
महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
या आंदोलनात व निवेदन सादरीकरणाच्या वेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रांतमंत्री योगेश्वरी गर्गे, विभाग मंत्री शांताराम शिंदे, विभाग सहमंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा उपाध्यक्ष खंडु पवार, विभाग संयोजक राकेश लोहार, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे, तसेच शिवसेना (शिंदे गट) व भाजपचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
आंदोलन शांततेत पार पडले असून, प्रशासनाने निवेदन स्वीकारले आहे. पुढील कार्यवाहीसाठी शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

