जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आढावा

जळगाव दि. १८ ऑगस्ट २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|

राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे.

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण किंमत रुपये ३५३३.०५ कोटी असून शासन निर्णय क्रमांक ९२४/प्र.क्र.४३६/२४/मो.प्र.१, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेतून जामनेर व पाचोरा तालुक्यातील ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे लाभक्षेत्र स्थिर केले जाणार असून एकूण ९८.३५ दलघमी पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्याद्वारे जळगाव तालुक्यातील १३,९०४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळेल.

प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. टप्पा-१ अंतर्गत जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, देव्हारी आदी २६ गावांतील १३,९०४ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर टप्पा-२ अंतर्गत ४४.५ किलोमीटर लांबीच्या उद्धरण नलिकेद्वारे व १८,४६७ अश्वशक्तीच्या पंपांद्वारे ९८.३५ दलघमी पाणी उचलून जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम तसेच जळगाव तालुक्यातील २ लघु अशा एकूण ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठवले जाणार आहे. यामध्ये कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प नव्याने तसेच एकुलती सा.त. प्रकल्प नव्याने उभारण्याचाही समावेश आहे. या टप्प्यातून १६,८६० हेक्टर क्षेत्राचे स्थिरीकरण होणार आहे.

या प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. प्रकल्पाच्या कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेऊन काम तातडीने सुरू करण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस सेवा निवृत्त अधीक्षक अभियंता श्री व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता श्री गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री प्रल्हाद वराडे, उप अभियंता श्री चंद्रशेखर खंबायत आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button