जळगावकरांसाठी पुण्याच्या प्रवासाची जलद व आधुनिक सुविधा; नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
भुसावळ आणि जळगाव रेल्वेस्टेशनवर वंदे भारत गाडीचे जंगी स्वागत

जळगाव दि. १० ऑगस्ट २०२५
|खान्देश लाईव्ह न्यूज|जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षण आज आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे.
भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या. जळगाव स्थानकावर खासदार श्री. उज्वल निकम, खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि आमदार श्री. सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत ट्रेन भारताच्या प्रगत तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, ‘एक भारत जोडलेला भारत’ या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे. या सेवेमुळे धार्मिक स्थळे, व्यापार, पर्यटन व रोजगाराच्या संधींना चालना मिळून विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



