जळगाव येथे ३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा

जळगाव दि. ३१ ऑगस्ट २०२५ |खान्देश लाईव्ह न्यूज|
महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून घोषित केल्यानिमित्ताने जळगाव शहरात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ‘भटके विमुक्त दिवस सोहळा’ के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शहरातील सर्व भटके विमुक्त समाज संघटनांनी आणि प्रतिनिधींनी एकत्रित कार्यकारिणीच्या माध्यमातून आवाहन केले होते. विशेष म्हणजे या संवर्गाच्या प्रथम गौरव दिनानिमित्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची सुरुवात सहायक संचालक योगेश पाटील यांच्या प्रस्ताविकाने झाली. यामध्ये त्यांनी शासनाच्या भटके-विमुक्त समाजासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली. सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ समाज बांधव सदाशिव वेडू जोशी आणि माजी समाज कल्याण सभापती राजेश वाडीलाल राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजभूषण मोरसिंग राठोड मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. डॉ. विजय लोहार यांनी ‘भटके विमुक्त गौरवगीत’ सादर करून उपस्थितांना समाजाचा भूतकाळ, वर्तमान व भविष्याची जाणीव करून दिली. प्रा. डॉ. रवींद्र बावने यांनी ‘भटके विमुक्त समाज : परंपरा आणि स्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना या समाजाच्या शौर्यपूर्ण इतिहासाची, कलात्मक परंपरेची आणि सध्याच्या समस्यांची मांडणी केली. ते म्हणाले की “समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन शिक्षणाच्या बळावर प्रगती साधली पाहिजे.”
यानंतर नगरदेवळे येथील प्रख्यात शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सहकाऱ्यांसह पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा सादर केला. आश्रमशाळांतील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे राजेश राठोड यांनी शासनाचे आभार मानले व समाजाच्या प्रगतीत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
चाळीसगाव तालुक्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी बंजारा व धनगर लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण केले. सोहळ्यात विविधांगी कार्यक्रम रंगतदार पद्धतीने सादर झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर विनोद ढगे यांनी केले, तर आभार रवींद्र जोशी व समाजकल्याण अधिकारी अमोल कुलकर्णी यांनी मानले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक संचालक कार्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच ललित ठाकरे, सदाशिव वेडू जोशी, आर. जी. बावने, अरुण वांद्रे, सुरेंद्र काळे, अनिल पवार, आनंदा जोशी, प्रविण सूर्यवंशी, डॉ. एकनाथ लोहार, प्रा. डॉ. विजय लोहार, महारु शिवदे, रवींद्र जोशी, सुशीलकुमार भुते, तुकाराम पवार, संजय लोकंलकर, राजेंद्र गोसावी, जगदीश बैरागी यांचे मोलाचे योगदान लाभले.



