जळगावात शिवसेनेला धक्का;निलेश पाटील जिल्हा सहसंपर्क प्रमुख यांचा राजीनामा
जळगाव | खान्देश लाईव्ह न्यूज |राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी वेगाने सुरू असताना शिवसेनेच्या शिंदे गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून, त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील पक्षात खळबळ उडाली आहे.
निलेश पाटील यांनी आपला राजीनामा थेट शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या कडे पाठवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात वाढत चाललेल्या नाराजीचा सुर उमटत असतानाच हा राजीनामा आल्यानं पाटील यांची अस्वस्थता उघड झाली असल्याचे मानले जात आहे. पक्षातील घुसमट आणि स्थानिक पातळीवरील काही निर्णयांबाबत असलेल्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, पाटील यांच्या राजीनामा पत्रात या कारणांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षातील धुसफूस वाढत असल्याच्या चर्चांनी राजीनाम्याला अधिक हवा मिळाली आहे. राजीनाम्यानंतर आता ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या संदर्भातील हालचालींना वेग आला असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली असताना निलेश पाटील सोशल मीडियावर सतत सक्रिय दिसत आहेत. त्यांच्या पोस्टमधून ते आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे ते राजीनाम्यानंतर कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार, तसेच महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या भूमिकेत उतरतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

