तांडा वस्ती, घरकुल, मनरेगा आदी विषयांचा गटविकास अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश

जळगाव, दि. २७ जून २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तांडा वस्ती विकास, घरकुल योजना, १५ वा वित्त आयोग निधी, दलित वस्ती सुधार योजना आणि मनरेगाच्या विविध घटकांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना मोरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, सर्व गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तांडा वस्तीतील वीज, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वाळू, मिस्त्री-गवंडी, विटांची उपलब्धता व अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली.
१५व्या वित्त आयोगांतर्गत पंचायत समित्यांनी केलेल्या खर्चाचे रोखपुस्तक व व्हाउचरच्या आधारे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दलित वस्ती सुधार योजनेतील निधी खर्चाच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
मनरेगा योजनेंतर्गत प्रलंबित व विलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच २१ ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनरेगामार्फत होणाऱ्या वृक्ष लागवड योजनेचे काटेकोर नियोजन करावे, असेही निर्देश देण्यात आले.

