पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालकाचा मृत्यू ; नागरिकांचा महापालिकेवर रोष
जळगाव, दिनांक २जून २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरात रविवारी संध्याकाळी घडलेली एक भीषण घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. अंगणात खेळणाऱ्या ४ वर्षीय अरविंद सचिन गायकवाड या निष्पाप बालकावर पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला करून त्याचा दुर्दैवी मृत्यू घडवून आणला. ही घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
अरविंद हा मजुरी करणाऱ्या सचिन गायकवाड यांचा मुलगा असून, तो संध्याकाळी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. याच वेळी अचानक एका मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्याने बालकाच्या चेहरा, मान व गळ्यावर जोरदार चावा घेतला. कपाळापासून हनुवटीपर्यंत आणि डोळा, गाल, मानेवर खोल जखमा करत त्याचे अक्षरशः लचके तोडले. गंभीर जखमी स्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नागरिकांनी केली बचावाची धडपड
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बालकाच्या किंकाळ्यांनी धावत जाऊन त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. बालकाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.
महापालिकेच्या विरोधात संताप, आमदारांचा घेराव
या हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयातच महापालिका अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी केली. “महापालिकेचा हलगर्जी कारभारच या मृत्यूला कारणीभूत आहे,” असा आरोप करत नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आमदार सुरेश भोळे हे रुग्णालयात पोहोचताच त्यांना नागरिकांनी घेराव घालून आपली व्यथा सांगितली. त्यांनी मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे आमदार भोळे यांनी रोष व्यक्त करत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
बालकावर हल्ला करण्याआधीच या कुत्र्याने एका कामावरून परतणाऱ्या महिलेला आणि इतर तीन ते चार मुलांनाही चावा घेतला होता. सम्राट कॉलनीतील मोहीन बेग अल्ताफ बेग या १९ वर्षीय युवकालाही हाताला चावा घेत जखमी केले.
कुत्र्यांचा उपद्रव वाढला
शहरातील श्वान निर्बिजीकरण योजना बंद पडल्याने मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधार असलेल्या व निर्मनुष्य रस्त्यांवर कामावरून परतणाऱ्या नागरिकांना सतत त्रास होत आहे. नागेश्वर कॉलनीतील रहिवासी नामदेव चौधरी, गोकूळ सोनवणे आदींनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्यांचा त्रास वाढलेला असून, प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी रामानंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मात्र पोलीस टाळाटाळ करत असल्याने त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे थेट तक्रार नोंदवली.

