अनु. जाती व नवबौध्द मुलांसाठीच्या निवासी शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. २१ मे २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचे अधिपत्याखालील डेराबर्डी, चाळीसगाव (जि. जळगाव) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत इ. ६ वी ते १० वी (सेमी इंग्रजी माध्यम) साठीच्या रिक्त जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता मोफत प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठी आरक्षणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे – अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती ५ टक्के, दिव्यांग ३ टक्के, तर विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण आहे.
शाळेची वैशिष्ट्ये –
शाळेत नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शिक्षणासह निवास व भोजनाची मोफत सोय असून, ई-लर्निंग, डिजीटल क्लासरुम, स्मार्ट टी.व्ही., संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, वाचनकक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. रात्र अभ्यासिका, वैयक्तिक मार्गदर्शनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शाळेचा निकाल १०० टक्के राहिला असून, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षकांचा ताफा येथे कार्यरत आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे –
शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, विद्यार्थी संचयिका पुस्तिका, पासपोर्ट साईज फोटो (६ प्रती), पालकाचे ओळखपत्र (मतदान/आधार/पॅन कार्ड) आणि विद्यार्थ्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल.
या शाळेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.



