जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींचे आदेश : सर्व रजा रद्द, तत्काळ सेवेत हजर राहण्याचे निर्देश

जळगाव, दि. ९ मे २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
जिल्ह्यात संभाव्य किंवा उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५, पोटकलम २(अ) नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. त्यानुसार अधिनियमाच्या कलम ३०(२)(iv), ३०(२)(xvi) व ३४(a) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या आदेशानुसार, दिनांक ९ मे २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत सर्व पूर्वमंजूर रजा रद्द करण्यात आल्या असून सध्या रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ आपल्या सेवास्थळी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता रजेवर जाऊ शकणार नाही किंवा मुख्यालय सोडू शकणार नाही.
संबंधित कार्यालय प्रमुखांनी या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करावी व अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सदर परिपत्रक ही प्रशासनिक अत्यावश्यकता असून त्याचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button